बिझनेसनामा ऑनलाईन । ऑनलाईन प्रक्रियेमुळे (UPI Transaction) पैश्यांची देवाणघेवाण ही फार मोठ्या प्रमाणात आणि सोयीस्कर होते. सध्या सर्वच जण UPI च्या माध्यमातून फोनपे, गुगलपे वरून एकमेकांना पैसे पाठवत आहेत. यामुळे आपला वेळ वाचतोय आणि ATM मधून पैसे काढण्याची आवश्यकताही भासत नाही. लोकांचा UPI पेमेंट वर इतका विश्वास वाढला आहे कि, UPI च्या सात वर्षांच्या इतिहासात प्रथमच ऑगस्ट 2023 मध्ये UPI व्यवहारांनी 10 अब्जचा टप्पा ओलांडला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याबाबत माहिती दिली आहे.
NPCI ने याबाबत ट्विट करत म्हंटल, UPI ने 10 अब्जाहून अधिक व्यवहारांचा (UPI Transaction) विस्मयकारक रेकॉर्ड मोडला आहे. ही अविश्वसनीय उपलब्धी आणि डिजिटल पेमेंटची पॉवर साजरी करण्यासाठी आमच्यात सामील व्हा. अशाच पद्धतीने UPI सह व्यवहार करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवूया. NCPI डेटानुसार, 30 ऑगस्ट रोजी UPI व्यवहारांनी 10.24 अब्ज पार केले. या व्यवहारांची एकूण रक्कम 15,18,456.4 कोटी रुपये होते.
व्यवहारांची संख्या 996 Cr वरून 2.8% वाढली- (UPI Transaction)
UPI द्वारे पेमेंट करण्याचा ट्रेंड देशात खूप वेगाने वाढला आहे. ऑगस्ट महिन्यात UPI ने 15.18 लाख कोटी किमतीचे 1,024.1 कोटी व्यवहार नोंदवले. मागील महिन्याची तुलना करायची झाल्यास यापूर्वी जुलैमध्ये UPI व्यवहारांचा आकडा 9.96 अब्ज (996.4 कोटी) होता आणि जूनमध्ये हा आकडा 9.33 अब्ज होता. देशात सर्वत्र ऑनलाईन पेमेन्टचे प्रमाण वाढलं आहे. हॉटेल्सपासून ते भाजी विक्रेत्यांपर्यंत आता यूपीआयद्वारे पेमेंट घेण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे यूपीआयची व्याप्ती सातत्याने वाढत आहे.
NPCI चे व्यवहार वाढवण्यावर लक्ष
UPI ने देखील व्यवहारांच्या संख्येच्या (UPI Transaction) बाबतीत 55% वार्षिक वाढ नोंदवली. ऑगस्ट 2022 मध्ये 658 कोटींवरून हा आकडा आता 10.24 अब्जवर आला आहे. दुसरीकडे, व्यवहार मूल्य ऑगस्ट 2023 मध्ये INR 10.73 लाख कोटींवरून 41% पेक्षा जास्त वाढले. हे डिजिटल पेमेंट टूल म्हणून UPI च्या वाढत्या लोकप्रियतेचा पुरावा आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये 100 कोटी मासिक व्यवहाराचा टप्पा ओलांडल्यापासून, प्लॅटफॉर्मने अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत 10X वाढ केली आहे. दरम्यान, NPCI ने दररोज 100 कोटी व्यवहार सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.