Wedding Season In India : सध्या भारतात लग्न समारंभांना वेग आलेला दिसतोय. काही काळापूर्वी लग्न म्हणजे एक धार्मिक विधी असं समजलं जायचं मात्र आता या संकल्पनेत बदल होत असून लग्न हा केवळ एक विधी राहिलेला नाही तर तो बाजारासाठी एक प्रकारचा व्यापारच बनलेला आहे. काळ जसा जसा बदलतो त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गोष्टीही बदलत जातात, काही जुन्या रूढी मागे पडतात आणि नवीन गोष्टी सामावल्या जातात. एकंदरीतच काय तर लग्न हा आत्ताच्या घडीला एक खर्चिक सोहळा बनला आहे. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, डेस्टिनेशन यांसारख्या अनेक घटकांवर लाखो रुपये खर्च केले जातात. जुन्या रुढी आणि परंपरेनुसार लग्नाचा सारा खर्च हा मुलीच्या बाजूने केला जायचा पण आता आपण जसं जसं शिक्षण घेत गेलो आणि आपल्या विचारांमध्ये परिवर्तन येत गेलं त्यानुसार ही संकल्पना बदलली आणि आपण खर्चाची दोन्ही पक्ष्यांमध्ये योग्य विभागणी करत लग्न समारंभाचा भार उचलायला सुरुवात केली, मात्र आज समोर आलेल्या बातमीनुसार आजकालची तरुण पिढी स्वतःच्या लग्नाचा खर्च त्यांच्या आई-वडिलांवर सोपवू इच्छित नाही.
काय सांगतो नवीन रिसर्च? (Wedding Season In India)
वरती म्हटल्याप्रमाणे सध्या देशात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ सुरू आहेत, आणि अश्याच लग्न समारंभांवर करण्यात आलेला एक रिसर्च सांगतो की आजकालची तरुण पिढी त्यांच्या लग्नाचा खर्च आई-वडिलांसाठी भार बनू नये म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे. अगदी आजही आपल्या देशातील अनेक आई-वडील त्यांच्या मुलांचा लग्न समारंभ योग्य रित्या पार पडावा, त्यात कोणतीही कमतरता दिसून येऊ नये म्हणून आयुष्यभर मेहनत घेतात. पण आता कदाचित शिक्षणामुळे आणि आजूबाजूचे जग बघितल्यामुळे तरुणांच्या विचारसरणीत बदल होत आहेत आणि म्हणूनच ते स्वतःच्या लग्नाची जबाबदारी स्वतः पेलण्यावर भर देतात (Wedding Season In India). तुम्हाला आश्चर्य वाटेल पण लग्नाचा खर्च करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांमध्ये मुलींचा आकडा हा मुलांपेक्षाही अधिक आहे. हा रिसर्च इंडिया लेन्डस कडून करण्यात आला होता, आणि त्यांचा अभ्यास सांगतो की देशातील 42 टक्के तरुण हे स्वतःच्या लग्नाचा खर्च स्वतः करण्यावर भर देत आहेत.
लग्नाचा खर्च करण्यात मुली वरचढ:
एक सर्व सामान्य मान्यता अशी असते की घरात मुलगी जन्माला आली की लग्नाचा खर्च हा तिच्या आई-वडिलांसाठी मोठा भार बनणार आहे. मात्र आजच्या या जगात मुली शिकतात तसेच स्वतःच्या मेहनतीवर घरातील जबाबदाऱ्या देखील सांभाळतात. इंडिया लेन्डस कडून करण्यात आलेला रिसर्च सांगतो की देशातील 60 टक्के महिला या स्वतःच्या लग्नाचा खर्च स्वतः उचलू पाहत आहेत, ज्यांच्या तुलनेत पुरुषांची संख्या ही केवळ 52 टक्के आहे.
अनेक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आजकालची युवा तरुण पिढी ही जास्तीत जास्त विलायती गोष्टींच्या अंगीकरणाकडे वळत आहे पण रिसर्च मात्र ही बाब पूर्णपणे खोडून काढतो. इंडिया लेन्डसच्या रिसर्च नुसार तरुण पिढी खरोखरच धार्मिक कार्य आणि परंपरा यात सर्वाधिक रुची घेताना दिसते. टीमने केलेल्या अभ्यासानुसार 41.1% वधू-वर हे कामाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या लग्नासाठी काही पैशांची तरतूद करून ठेवतात तर 26.3% वधू-वर हे लग्नाच्या वेळी लोन घेण्याची तयारी दाखवतात ( Wedding Season In India). इंडिया लेन्डस कडून ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान केलेल्या या रिसर्चमध्ये एकूण 12 हजार लोकांचा समावेश होता ज्यात देशातील 20 शहरांमधील 25 ते 40 वर्षांच्या वधू-वरांच्या म्हणण्याचा अभ्यास करण्यात आला.