Dollar Index म्हणजे काय? संपूर्ण जगाचे त्यावर का लक्ष असते?

बिझनेसनामा । डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याच्या किंवा घसरल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. तसेच करन्सी मार्केटशी संबंधित अनेक बातम्यांमध्ये आपल्याला डॉलर इंडेक्सचा उल्लेख नक्कीच पाहायला मिळतो. अशा स्थितीत करन्सी मार्केटशी संबंधित बातम्यांमध्ये या इंडेक्सला इतके महत्त्व का दिले जाते??? असा प्रश्न अनेकदा आपल्या मनात डोकावतो. मात्र या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याआधी आपण डॉलर इंडेक्स म्हणजे काय??? हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल.

डॉलर इंडेक्स म्हणजे काय???

… तर डॉलर इंडेक्स हा जगातील 6 प्रमुख करन्सीच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद किंवा कमकुवतपणा दर्शवणारा इंडेक्स आहे. यामध्ये त्या सर्व देशांच्या करन्सीचा समावेश होतो, जे अमेरिकेचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. यामध्ये युरो, जपानी येन, कॅनेडियन डॉलर, ब्रिटिश पाउंड, स्वीडिश क्रोना आणि स्विस फ्रँक अशा एकूण 6 करन्सीचा समावेश आहे. या सर्व करन्सीना त्यांच्या महत्त्वानुसार वेगवेगळे वेटेज देण्यात आले आहे. इथे हे लक्षात घ्या कि, डॉलर इंडेक्स जितका जास्त असेल तितका डॉलर मजबूत मानला जातो, तसेच त्यामध्ये झालेली घसरण म्हणजे इतरांच्या तुलनेत तो कमकुवत होतो आहे.

डॉलर इंडेक्समध्ये कोणत्या करन्सीचे किती वेटेज आहे ते पहा

हे जाणून घ्या कि, प्रत्येक करन्सीचा एक्सचेंज रेट वेगवेगळ्या प्रमाणात डॉलरच्या इंडेक्सवर परिणाम करतो. यामध्ये युरोचे वेटेज सर्वाधिक तर स्विस फ्रँकचे वेटेज सर्वात कमी आहे. प्रत्येक करन्सीचे वेगवेगळे वेटेज म्हणजे त्या इंडेक्स मधील करन्सीचे वेटेज जितके जास्त असेल तितका त्या इंडेक्स मधील बदलाचा प्रभाव जास्त असेल. साहजिकच, जेव्हा युरोमध्ये चढ-उतार होतो तेव्हा डॉलरच्या इंडेक्सवर सर्वात जास्त परिणाम होतो.

युरो : 57.6%
जपानी येन: 13.6%
कॅनेडियन डॉलर: 9.1%
ब्रिटिश पाउंड: 11.9%
स्वीडिश क्रोना: 4.2%
स्विस फ्रँक: 3.6%

डॉलर इंडेक्सचा इतिहास

1973 मध्ये यूएसची मध्यवर्ती बँक असलेल्या यूएस फेडरल रिझर्व्हने डॉलर इंडेक्स लाँच केला होता. त्यानंतर त्याचा बेस 100 होता. तेव्हापासून या इंडेक्समध्ये फक्त एकदाच बदल झाल्याचे पहायला मिळाले आहे, जेव्हा जर्मन मार्क, फ्रेंच फ्रँक, इटालियन लिरा, डच गिल्डर आणि बेल्जियन फ्रँक हे सर्व युरोमध्ये बदलण्यात आले होते. इतक्या वर्षांत डॉलर इंडेक्स हा 90 आणि 110 च्या दरम्यान जास्त राहिला आहे, मात्र 1984 मध्ये तो 165 पर्यंत वाढला होता, जो त्याचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. तसेच, त्याची सर्वात कमी पातळी 70 आहे, जी 2007 मध्ये दिसून आली होती.

डॉलर इंडेक्सला इतके महत्त्व का आहे???

डॉलर इंडेक्समध्ये फक्त 6 करन्सीचा समावेश असला तरी जगातील जवळपास सर्वच देश त्याकडे लक्ष देऊन असतात. यामागील कारण असे कि, जगातील बहुतांश आंतरराष्ट्रीय व्यापार फक्त डॉलरमध्येच होत नाही तर सर्व देशांच्या सरकारांच्या परकीय चलनाच्या साठ्यातही डॉलर हे सर्वात प्रमुख चलन आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलर ही जगातील सर्वात महत्त्वाची करन्सी आहे.