आर्थिक मंदी म्हणजे काय? भारताला यापूर्वी मंदीचा सामना करावा लागला होता का?

बिझनेसनामा । सध्या जगभरात आर्थिक मंदीचे सावट आले आहे. वाढत जाणारी महागाई आणि व्याजदरात सातत्याने होणारी वाढ यामुळे अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये आर्थिक मंदीचा धोका आणखी गडद होतो आहे. युरोप मंदीकडे सरकत असल्याचे मतही अनेक अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर येत्या वर्षभरामध्ये अमेरिकेतही मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे जर अमेरिकेत मंदी आली तर त्याचा परिणाम जगातील सर्व देशांवर विपरीत होईल.

हे लक्षात घ्या कि, आर्थिक मंदीमुळे महागाई आणि बेरोजगारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. लोकांचे घटते उत्पन्न आणि अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे शेअर बाजारातही सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून येते आहे. चला तर मग आज आपण आर्थिक मंदी म्हणजे काय ??? तसेच याद्वारे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी कशी पोहोचवते याबाबतची माहिती जाणून घेऊयात…

आर्थिक मंदी म्हणजे काय ???

हे जाणून घ्या कि, जेव्हा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या GDP ची वाढ सलग दोन तिमाहीमध्ये कमी होते तेव्हा त्याला मंदी असे म्हंटले जाते. दुसर्‍या शब्दांत समजून घ्यायचे झाले तर, जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्याऐवजी घसरण होते आणि पुढच्या अनेक तिमाहीमध्ये हाच कल चालू राहिला तर देशात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होऊ लागते.

मंदीमुळे अशाप्रकारे बिघडते परिस्थिती

आर्थिक मंदीदरम्यान लोकांकडे पैशांची कमतरता भासते. ज्यामुळे ते आपल्या गरजा कमी करण्याचा प्रयत्न करतात. याच्या परिणामी बाजारातील मागणीमध्ये घट होऊ लागते आणि उत्पादनांची विक्री कमी होते. अशा परिस्थितीत जेव्हा मागणी कमी होते, तेव्हा उत्पादनावरही परिणाम होणे स्वाभाविक आहे. ज्यामुळे कंपनीच्या नफ्यावरही परिणाम होऊन कर्मचाऱ्यांची कपात सुरू होते. ज्यायोगे लाखो लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागू शकतो.

त्याच प्रमाणे आर्थिक मंदीचे मुख्य कारण म्हणजे पैशाचा प्रवाह किंवा गुंतवणूक थांबणे हे देखील आहे. कारण लोकांची क्रयशक्ती कमी होते, त्याचप्रमाणे भारतातून आणि परदेशातून येणारी गुंतवणूकही कमी होते. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात, त्यामुळे महागाईचा दरही आणखी वाढतो आणि लोकांना दैनंदिन वापराच्या वस्तूंची खरेदी करता येत नाहीत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरलेले मूल्य हे देखील यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. हे लक्षात घ्या कि, मंदीच्या काळात आयातीच्या तुलनेत निर्यात कमी झाल्यामुळे, देशाची वित्तीय तूट वाढते आणि परकीय चलनाच्या साठ्यामध्ये घट होते.

मंदीचा भारतावर कसा परिणाम होईल ???

सध्या मंदीचा अंदाज कायम असला तरीही त्याचा भारतावर थेट परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे अमेरिका, युरोप आणि चीनसारख्या मोठ्या जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या जखडात येततील, असे मानले जात आहे. पुढील वर्षापर्यंत जगात आर्थिक मंदी येण्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञ आणि उद्योगपतींनी व्यक्त केली आहे.

याआधी भारतात आलेल्या आर्थिक मंदी विषयी जाणून घ्या

भारत आपल्या स्वातंत्र्यानंतर एकूण चार मंदीतून गेला आहे. RBI च्या जीडीपी वाढीच्या आकडेवारीवरून याची पुष्टी केली जाईल. याआधी भारतात 1958, 1966, 1973 आणि 1980 मध्ये आर्थिक मंदी आली होती.

1957-58 मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा दर मायनसमध्ये गेला. या वर्षी जीडीपी वाढीचा दर -1.2 टक्के नोंदवला गेला. आयात बिलात झालेली मोठी वाढ हे त्यामागील प्रमुख कारण होते.

1965-66 या आर्थिक वर्षातील भीषण दुष्काळ आणि दुष्काळामुळे भारताची जीडीपी वाढ पुन्हा उणेमध्ये गेली.

जागतिक तेल संकटामुळे 1973 मध्ये मंदीची परिस्थिती निर्माण झाली होती. ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम प्रोड्युसिंग अरब कंट्रीज (OAPEC) ने योम किप्पूर युद्धात इस्रायलची बाजू घेणाऱ्या सर्व देशांना तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे काही काळ तेलाच्या किंमती 400 टक्क्यांपर्यंत वाढल्या होत्या.

यानंतर 1980 मध्ये झालेल्या इराणच्या क्रांतीमुळे जगभरातील तेल उत्पादनाला मोठा फटका बसला होता आणि त्यामुळे या वर्षी भारतात मंदी आली होती. त्यादरम्यान तेलाच्या आयातीच्या किंमतीही प्रचंड वाढल्या होत्या.

याशिवाय 1991, 2008 आणि 2020 मध्येही भारताला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. या काळात भारताची अर्थव्यवस्था कमालीची कोलमडली होती.