Zomato News: झोमॅटो या कंपनीचे नाव ऐकले आहे ना? नक्कीच ऐकलं असेल कारण आजकालच्या Online जगात वावरणाऱ्या आपल्याला या गोष्टी काही नवीन नाहीत. जिभेवर चव आली की आपल्यापैकी अनेकजण झोमॅटोकडे वळत असतीलच, आणि याच झोमॅटोच्या चाहत्यांसाठी आजची ही बातमी नक्कीच खास आहे. आपल्या देशात शाकाहारी लोकांची संख्या बऱ्यापैकी वाढत आहे आणि याचाच अंदाज घेऊन झोमॅटोचे मालक दीपिंदर गोयल यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे, ती काय हे पाहुयात..
झोमॅटोची नवीन घोषणा कोणती? (Zomato News)
देशातील शाकाहारी जनतेला खुश करण्यासाठी झोमॅटोने एक खास योजना आणली आहे, ज्यामधून कंपनी ‘Pure Veg Mode’ आणि ‘Pure Veg Fleet’ अश्या दोन सेवा भारतात सुरु करणार आहे. एका शाकाहारी माणसाला नेहमीच अन्न कसं बनत असेल याची चिंता सतावत असते. याच प्रकारचे अभिप्राय झोमॅटोच्या नजरेत आले असून त्यांनी वेळेत त्याची दाखल घेत याची आखणी केली आहे. तुम्ही जर का शाकाहारी असाल तर आता या नवीन सेवेमुळे तुम्हाला फक्त आणि फक्त शुद्ध शाकाहारी जेवण देणारी रेस्टॉरंट्सच दिसतील. म्हणजेच आता शाकाहारी लोकांना मांसाहारी पदार्थांची काळजी करण्याची गरज राहिलेली नाही.
झोमॅटोचे CEO दीपिंदर गोयल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या नवीन सुविधेची घोषणा केली(Zomato News). ते म्हणाले की, “Pure Veg Mode” शाकाहारी लोकांसाठी खास बनवण्यात आला आहे. यामुळे त्यांना मांसाहारी पदार्थांची चिंता न करता, मनापासून जेवण ऑर्डर करता येईल. गोयल यांनी स्पष्ट केले की, “Pure Veg Mode” कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय विचारांवर आधारित नसून फक्त शाकाहारी लोकांसाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बनवण्यात आला आहे.